भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूर येथे इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक दर्शनी एखादा अपघात किंवा शॉर्टसर्कीटमुळे ही घटना झाली असावी असं वाटत असलं तरी या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुभम दीक्षित असं या 27 वर्षीय युवक असून, त्याला संजय म्हणून देखील ओळखल्या जातं. प्रेमाला नकार दिलेल्या महिलेचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यानं ही आग लावल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मात्र काल झालेल्या या घटनेत महिलेला आणि तिच्या आईला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. (Indore fire : Rejected lover behind fire that killed 7, arrested)
संजयचं या महिलेवर प्रेम होतं, तसंच या महिलेला काही पैसेही त्याने दिले होते. मात्र तिचं लग्न दुसऱ्यासोबत झाल्यानंतर आरोपीनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने तिला पैसे परत करण्याची मागणी केली आणि त्यामुळे त्यांच्यात नियमित भांडण होऊ लागली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीनं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
"इमारतीच्या पार्किंगमधून मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, संजय शनिवारी पहाटे 2.55 वाजता प्रवेश करताना आणि महिलेच्या स्कूटरवर काहीतरी ओतताना दिसला," असं इंदूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी संपत उपाध्याय यांनी सांगितलं. फुटेजमध्ये आगीचा मोठा भडका झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजुला उभ्या असलेल्या इतर वाहनांमध्येही ती आग पसरली. त्यानंतर या आगीने ७ जणांचा बळी घेतला. तसंच आरोपी घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतानाही दिसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोहमंडी परिसरात रस्त्यावर पडून तो जखमी झाला. त्याच्यावर विध्वंस घडवून आणणे, हत्या करणे असे आरोप आहेत.