संजय देसाई|सांगली: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली जिल्हा परिषदेच्या पदभरतीला मुहूर्त लागला आहे. एकूण १७ संवर्गातील ७५४ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया शनिवार दि. ५ पासून प्रारंभ होत आहे. दि. २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. भरतीमध्ये परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य पर्यवेक्षकासह विविध पदांचा समावेश आहे.
कित्येक वर्षांनंतर भरती होत असल्याने पदवीधर बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे. मात्र ही भरती पारदर्शीपणा व्हावी अशी अपेक्षा बेरोजगार करीत आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकास कामांसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गनिहाय भरती होत आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक ४, आरोग्य सेवक (पुरुष) १७, आरोग्य सेवक (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) १६८, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) ३६६, औषध निर्माण अधिकारी २३, कंत्राटी ग्रामसेवक ५२, कनिष्ठ अभियंता (स्थापत्त ) २६, कनिष्ठ आरेखक १, कनिष्ठ सहाय्यक ३४, कनिष्ठ सहाय्यक लेखा ४, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका ९, पशुधन पर्यवेक्षक २२, प्रयोगशाळा तंत्र १, विस्तार अधिकारी (कृषी) १, विस्तार अधिकारी (पंचायत) १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघू पाटबंधारे) - २३ असे एकूण ७५४ पदाची भरती होणार आहे.
या नोकरभरतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शासनाकडून जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असली तरी ही भरती पारदर्शीपने पार पडावी अशी अपेक्षा बेरोजगार प्रतिनिधी व्यक्त करीत आहेत