अमोल नांदुरकर, अकोला
अकोला शहरातील सर्व बार हे आज बंद आहेत. सर्व बार मालकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचं कारणही तसंच आहे. एका बार संचालकाला मारहाण झाल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलच्या आय. सी. यु. कक्षात घुसून धमकावल्याचा प्रकार अकोल्यात घडलाय.
न्यू नितीन बारमध्ये दारू पिऊन बिल संबंधी वाद घालून बार मालकाला खंडणीची मागणी केली. पैसे न देता उलट खंडणी मागत असलेल्या चार युवकांना मालकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर या युवकांनी नितीन शाहकार यांच्यावर काचेचा ग्लास फेकून त्यांना गंभीर जखमी केलं. मग, तिथून पळ काढला. यानंतर, बार मालकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं.
प्रकरण इतक्यातच संपलं नाही
मात्र हे गुंडे इथपर्यंतच थांबले नाहीत तर, नितीन शाहकार हे ज्या हॉस्पीटलमध्ये होते त्या हॉस्पीटलमध्ये थेट आय.सी.यु. मध्ये जाऊन बार मालकाला जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेच्या विरोधात काल शहरातील बारमालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आज अकोला शहरातील संपूर्ण बार बंद ठेवीत झालेल्या घटने चा निषेध केला.