प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.
यावेळी रतन टाटा यांचे अनेक किस्से लक्षात येतात. त्यापैकी एक म्हणजे जेव्हा रतन टाटा यांनी त्यांच्या लाडक्या श्वानासाठी प्रिन्स चार्ल्सकडून मिळणारा पुरस्कार नाकारला होता. हा किस्सा चांगलाच चर्चेत आहे. रतन टाटा यांचे प्राणीप्रेम सर्वांनाच माहित आहे.
प्रसिद्ध उद्योगपती सुहैल सेठ यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील बकिंगहॅम पॅलेसमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये स्वतः प्रिन्स चार्ल्स त्यांचा सन्मान करणार होते. 2018 फेब्रुवारीमध्ये रतन टाटा यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करायचे होते. 6 फेब्रुवारी 2018 रोजी ब्रिटनच्या बकिंगहम पॅलेसमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सोहळ्याच्या आधीच रतन टाटा यांनी या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला. सुहेल सेठ यांनी सांगितले की, माझ्या मोबाईलवर रतन टाटांचे 11 मिस्ड कॉल आले होते. मी त्यांना जेव्हा कॉल केला, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, त्यांचे दोन कुत्रे टँगो आणि टिटो यांच्यापैकी एक प्रचंड आजारी पडला आहे. त्यामुळे आपण पुरस्कार सोहळ्याला येऊ शकत नाही.
त्यानंतर ही गोष्ट जेव्हा प्रिन्स चार्ल्सला समजली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगताना सुहेल सेठ म्हणाले की, जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना रतन टाटा येत नाहीत असे समजलं आणि जेव्हा त्यांना त्यांचं न येण्याचे कारण समजलं, तेव्हा त्यांना त्यांचं मोठं कौतुक वाटलं. ते म्हणाले, हा खरा माणूस आहे.