देशातील प्रसिद्ध उद्योगपती, सगळ्याचं लाडके टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयातील (Breach Candy Hospital) आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
रतन टाटा यांना रविवारी रात्री उशिरा कमी रक्तदाबाचा (Low Blood Pressure) त्रास जाणवू लागला. म्हणून त्यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रीच कँडी रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली रतन टाटांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
रतन टाटा यांना रात्री उशिरा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. "माझ्या प्रकृतीविषयी समाज माध्यमांवर अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझे वय लक्षात घेता. सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही रूटीन वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही. कोणीही चुकीची माहिती पसरवू नये." असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याबद्दल सर्व भारतीयांमध्ये एक विशेष स्थान आहे. त्यांना रूग्णालयात दाखल केल्याचे माहिती पडताच सर्वत्र चर्चांना उधाण आले. मात्र, रतन टाटा यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून प्रकृतीची अपडेट मिळाली आहे. त्यांच्याविषयी कोणतीगी अफवा पसरवली जाऊ नये असे आवहन करण्यात आले आहे.
रतन टाटा यांचा थोडक्यात परिचय
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई झाला. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. रतन टाटा हे उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. 1990 ते 2012 पर्यंत 22 वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे. रतन टाटा यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे देशभरात ते विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या संपत्तीमधील बरचसा हिस्सा दानधर्मासाठी देत आहेत.