सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन उपोषण केले. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आरक्षणासाठी अनेक मागण्या करत २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. आता २३ डिसेंबर रोजी पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सभा घेत आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राष्ट्रपतीने मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. हे राष्ट्रपती म्हणजे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाही तर तीन वर्ष वयाचा मुलगा आहे.
नमस्कार, मी राष्ट्रपती बोलतो सरकारला विनंती आहे मराठ्यांना आरक्षण द्या, अशी आर्त हाक धाराशिव जिल्ह्यातील चिंचोली येथील राष्ट्रपती नावाच्या तीन वर्षीय चिमुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, सद्या आरक्षणाची गरज आहे असेही या चिमुकल्याने म्हंटले आहे.
राष्ट्रपती नावाच्या मुलाचा ही मागणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राष्ट्रपती हा धाराशिव जिल्ह्यातील दत्ता चौधरी यांचा मुलगा असून त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान असे आहे. या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर त्यांचे नामकरण झाल्यानंतर ही मुले चर्चेत आली होती.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला होता. तो कालावधी उद्या संपत आहे. त्यामुळे बीड येथे आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. या सभेत जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीडमध्ये सभास्थळी पोहचतील.