राजस्थान रॉयल्सविरोधात झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू राशिद खानने अप्रतिम कामगिरी केलीय. राशिदने गोलंदाजी करून एक विकेट घेण्याची कमाल केलीच, पण धकाडेबाज फलंदाजीच्या जोरावर ११ चेंडूत २४ धावा कुटल्या आणि गुजरातला या सामन्यात दमदार विजय मिळवून दिला. राशिदच्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीमुळं त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे राशिद खान आयपीएल इतिहासात २५ किंवा त्यापेक्षा कमी वयोगटात सर्वात जास्त प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकणार खेळाडू बनला आहे.
राशिद १२ वेळा आयपीएलमध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकण्यात यशस्वी झाला. अशी चमकदार कामगिरी करून राशिदने एकाचवेळी अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. शुबमन गिलने आयपीएलमध्ये ९ वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकला आहे. ऋतुराज गायकवाडने ८ वेळा, रोहित शर्मा ७ वेळा, तर रहाणेनंही २५ किंवा त्यापेक्षा कमी वयात ७ वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकला आहे. तसंच संजू सॅमसननेही आयरपीएलमध्ये ७ वेळा हा किताब जिंकला आहे. राशिद खानचं वय असून गिल २४ वर्षांचा आहे. अशातच गिलकडे राशिदचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
२५ किंवा त्यापेक्षा कमी वयोगटात IPL प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकणारे खेळाडू
१२ - राशिद खान
९ - शुबमन गिल
८ - ऋतुराज गायकवाड
७ - रोहित शर्मा
७ - अजिंक्य रहाणे
७ - संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ३ विकेट्स गमावून १९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर गुजरातने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून कमाल केली. या हंगामात राजस्थानचा पहिल्यांदा पराभव झाला. शेवटच्या चेंडूवर विजय संपादन करण्याचा गुजरात टायटन्सचा आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. याआधी २०२२ मध्ये गुजराने हैदराबाद विरोधात झालेल्या सामन्यात १९६ धावा करून विजय मिळवला होता.