रवी जेस्वाल : जालना | जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव 'जांब समर्थ' येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांनी अखेर चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर भाविकांकडून मोठा रोष व्यक्त करत आंदोलन केलं होतं.
या चोरीचा छडा फक्त पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या तंबाखू आणि चपलेतून झाला. तर दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मूर्ती देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांच्या कारवाईबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
22 ऑगस्टला समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरीची घटना समोर आली होती. या घटनेची गंभीरता लक्षात घेत तपास स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. माजी मंत्री राजेश टोपेंनी अधिवेशनात या चोरीचा प्रश्न मांडला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाचे आदेश दिले. मात्र चोरीचा छडा लागत नसल्याने भाविकांकडून आंदोलन करण्यात आले. 21 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. तर आता चोरीनंतर आता 67 दिवशी दोन चोरटे पकडण्यात यश आले.