येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी, महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशातच शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जागावाटपावरून भाजवर हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीमध्ये कोणत्या पक्षाला जागा मिळणार, असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया देत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. भाजपकडून केसाने गळा कापला जाऊ शकतो, असं तुम्हाला का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना कदम म्हणाले, निवडून आलेल्या १८ जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या? गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन जेव्हा टोकाची भूमिका घेतात, तेव्हा आम्ही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
रामदास कदम लोकशाहीला प्रतिक्रिया देताना म्हणाले, २००९ मध्ये ज्यावेळी मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळी मी दापोलीची जागा मागितली होती. पण उद्धव ठाकरेंनी आणि गोपिनाथ मुंडे यांनी मला गुहागर मतदार संघ दिला. या मतदारसंघाचा माझा काहीच संबंध नव्हता. २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. शिवसेना भाजपची युती होती. असं असताना दापोली मतदार संघात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी युती असताना उघडपणे राष्ट्रवादीचं काम केलं आणि माझ्या मुलाला पाडण्याचं काम केलं. दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न झाला पण ते त्याठिकाणी निवडून आले. आता पुन्हा योगेशच्या मतदारसंघात भाजपच्या वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने कामे आणली. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवण्याचं काम त्यांनी केलं.
नरेंद्र मोदींमुळेच राम मंदिर झालं. मोदी-शहांबाबत प्रचंड अभिमान आहे. केंद्रातल्या नेत्यांबाबत नाराजी नाही. मला पाडलं तसं माझ्या मुलाच्या बाबतीतही निर्माण केलं जात आहे. कुणाचा बाप आला तरी तो आम्हाला हरवू शकत नाही. योगेश कदमांना पाडण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत, जी भूमिका भाजप घेत आहेत, तीच भूमिका आम्ही विधानसभा आणि लोकसभेत घेतली. आम्ही विश्वासाने शिंदे गटासोबत आलो आहोत. तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, गोव्याचे मुख्यमंत्री उमेदवार कसे निश्चित करतात. आमच्या पाठित खंजीर खुपसताय का? विश्वासानं भाजपसोबत आलोय त्याचं हे फळ मिळतय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. अडीच वर्षात आमदारांमध्ये अडीच तास गेले नाहीत. ५५ वर्ष शिवसेनेत मातोश्रीला सर्वात जास्त ओळखतो. शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी वाट लावली, मोदींनी राम मंदिर बांधून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. यवतमाळ, मावळ, रायगड, रत्नागिरी मतदारसंघ अडचणीत आहे. शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही. भाजपच्या मदतार संघांवर दावा केलेला नाही. शिवसेनेनं जिंकेलेल्या १८ जागा तरी सोडाव्यात. एकनाथ शिंदेची भाजपने फसवणूक केल्याचा मेसेज जाईल. आपण दोघे भाऊ-भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ, अशी रणनिती आह, असंही ते म्हणाले.