पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा आहे. मराठी अस्मितेच्या मुद्दयावरुन ते हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत आणि संध्याकाळी होणाऱ्या सभेपासून ते सकाळी 10 वाजेला होणाऱ्या या सभेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यास मनसेनं (MNS) आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. गुडी पाडवा मेळावा, ठाण्यातील उत्तर सभा, पुण्यातील महाआरती आणि औरंगाबादच्या ऐतिहासिक सभेनंतर मनसेचं वादळ आता पुण्यात धडकणार आहे. आज पुण्यातील गणेश कला क्रिडा मंडळात मनसेची सभा पार पडेल. या सभेतून मनसे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. मात्र इतर काही गोष्टींमुळे देखील ही सभा विषेश असणार आहे. (Raj Thackeray Pune Sabha)
वसंत मोरेंचं नाराजी नाट्य
मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची ही नाराजी स्पष्ट दिसून येत असून, काल म्हणजेच राज ठाकरेंच्या सभेच्या पुर्व संध्येला त्यांनी नाराजी व्यक्त करणारं एक फेसबूक लाईव्ह केलं. ज्यामुळे एकीकडे राज्यात राज ठाकरेंच्या भाषणाची चर्चा होतेय, तर दुसरीकडे वसंत मोरेंच्या नाराजीची. वसंत मोरे यांनी व्हिडिओमधून निलेश माझीरे यांच्यावर पक्षातून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. "निलेश माझीरेबद्दल काही गोष्टी व्हायरल झाल्या, त्यानंतर लगेचच त्याच्यावर कारवाई झाली. कोर्टात जे पुरावे गृहीत धरले जात नाहीत, ते पुरावे यांच्या कोर्टात गृहीत धरले जात नाही. पक्षातील काही पार्ट टाईम कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक वंसत मोरेंची टीम संपवण्याचं काम केलं जातंय. निलेश महाजीरेंकडून पद काढून घेण्यात आलं, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मी त्या लोकांना सांगू इच्छितो की, स्पर्धा करायची असेल तर पक्षाचे किती नगरसेवक येतील याची करा" असं वसंत मोरे म्हणाले. त्यामुळे या सभेत राज ठाकरे पक्षातील अंतरर्गत गटबाजी बद्दल बोलणार का? वसंत मोरेंच्या नाराजी नाट्याचा निकाल लावणार का हे पाहावं लागणार आहे.
अयोध्या दौऱ्यावरुन झालेली अडचण
राज ठाकरे यांनी मोठ्या उत्साहत अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांनी नवचैतन्य निर्माण झालं होतं. अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे बुकींगपासून मोठी तयारी मनसेनं सुरु केली होती. मात्र एकीकडे राज्यातल्या भाजपने त्यांच्या या भुमिकेचं स्वागत केलं होतं, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरेंना तगडं आव्हान दिलं होतं. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्दयाला घेऊन परप्रांतीय लोकांना त्रास दिला, त्यामध्ये अनेक उत्तर भारतीयांना त्यांनी त्रास दिला होता. रोजगारासाठी, शिक्षणासाठी, उपचार घेण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावलं होतं. अनेक उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण देखील त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू शकणार नाही. ते विमानातून इथपर्यंत आले तरी त्यांना जमिनीवर आम्ही पाय ठेवू देणार नाही. त्यांनी आधी मागावी मग अयोध्येला यावं असं बृज भुषण सिंह म्हणाले होते. त्यानंतर आता भाजप खासदार बृज भुषण सिंग यांनी आणखी आक्रमक भुमिका घेतली आहे. या सर्व घडामोडी सुरु असताच राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्याने, ते बृज भुषण सिंह यांच्या आव्हानानंतर मागे हटले का? असा सवाल निर्माण होतोय. त्यामुळे आजच ते याबद्दल स्पष्टीकरण देणार आहे. आजवर मनसेला एवढ्या आक्रमकपणे मिळालेलं हे पहिलं आव्हान होतं, त्यामुळे राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं विषेश ठरणार आहे.