मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भुमिकेमुळे अयोध्या (Ayodhya) पुन्हा एकदा चर्चेत आहे. आधी भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), महाआरती आणि नंतर अयोध्या दौऱ्याची घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना आज एक पत्र लिहीलं आहे.
मनसैनिकांवर झालेल्या कारवाईवरुन राज ठाकरेंनी सरकारला सवाल केले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालिसा वाजवू हे आवाहन केल्यानंतर पोलिसांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या आहेत. तसंच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी असा काय गुन्हा केला आहे असा सवाल राज ठाकरेंनी या पत्रातून केला आहे.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या या पत्रात ते म्हणाले की, पोलीस निजाम किंवा रझाकार शोधत असल्या सारखे संदीप देशपांडेंना शोधत आहेत. पोलिसांना असे आदेश कोणी दिले हे जनेतेने पाहिलं आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, की आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असाही सवाल केला आहे की, जसं पोलीस मनसे कार्यकर्त्यांना शोधत आहेत, तसे ते मशिदीमधील शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधण्यासाठी अशा पद्धतीनं काम करतात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान...
बृज भुषण सिंह यांनीही राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या संत सम्मेलनातून त्यांनी राज ठाकरेंना आणखी एक संधी देतोय असं म्हणत राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागायची नसेल तर त्यांनी संत समाजाची माफी मागावी असं आवाहन केलं आहे. जर राज ठाकरेंनी माफी मागायची नसेल तर त्यांनी आयुष्यात कधीही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पाय ठेवण्याचा विचार करु नये. त्यांनी केलेलं पाप त्यांच्या नेहमी लक्षात येईल असं बृजभुषण सिंह म्हणाले.