भाजप खासदार बृज भुषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मोठं आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन उत्तर भारतीयांना त्रास दिला असून, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी बृज भुषण शरण सिंह यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात त्यांनी आता मोठी आघाडी उघडली असून, आज त्यांनी त्याच माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अशा अनेक लोकांना उभं केलं, ज्यांना महाराष्ट्रामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. तसंच त्यांनी पुन्हा सांगितलं की, राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा ते अयोध्येत कधीच पाय ठेवू शकणार नाहीत.
बृज भुषण शरण सिंह यांच्या या पत्रकार परिषदेत अनेक लोकांनी आपली आपबीती सांगितली. तर काहींनी आपल्या अंगावरील जखमा देखील दाखवल्या. यावेळी बृज भुषण शरण सिंह यांनी सांगितलं की, उत्तर भारताचे आणि महाराष्ट्राचे संबंध नेहमी चांगले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो, महाराष्ट्रातल्या लोकांचाही आम्ही सन्मान करतो मात्र राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भेद निर्माण केला. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं बृ भुषण सिंह म्हणाले आहेत. ते यावेळी असंही म्हणाले की, मी केलेल्या आवाहनानुसार ५ जुन रोजी अयोध्येत ५ लाख लोक आलेले असतील. या ५ लाखांचे ६ लाख होतील, मात्र एक हजार सुद्धा कमी होणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी माफी मागितली तरी, ते अयोध्येत येऊ शकणार नाही.
दरम्यान, त्यांच्या या विरोधामागे काही राजकीय हेतू आहे का? असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी ५ वेळा खासदार राहिलो आहे, माझी पत्नी एकदा खासदार राहिली आहे, माझा मुलगा आमदार आहे. त्यामुळे मला इतर कोणतीही राजकीय इच्छा आकांशा नाही. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना दिलेल्या त्रासामुळे मी हे करतोय. मी त्यांना 2008 पासून शोधत होतो. मात्र ते एका वर्तुळात राहतात, त्याबाहेर ते येत नाहीत. ते यापूर्वी जरी मला भेटले असते तर मी त्यांना जाब विचारला असता असं बृज भुषण म्हणाले. तसंच मुख्यमंत्री योगींनी मुंबईत उत्तर भारतीय कार्यलय तयार करण्याची घोषणा केली, ती आपल्याच आंदोलनाचं यश असल्याचं बृज भुषण सिंह यांनी सांगितलं.