आदेश वाकळे, संगमनेर
अकोले तालुक्याच्या मुळा-प्रवरा पट्ट्यात होणाऱ्या अति मुसळधार पाऊस, वारा आणि थंडी यामुळे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी येथील आदिवासी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. विशेषतः छोट्या प्राण्यांना त्याचा जास्त त्रास होतो.त्यामुळे पाऊस आणि थंडीपासून शेळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी आदिवासी शेतकन्यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. खताच्या प्लॅस्टिकच्या गोण्यांचा वापर करून शेळ्या पावसात भिजू नये आणि थंडी बाजू नये म्हणून रेनकोट तयार करण्यात आले आहेत.
तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्टा असलेल्या अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांजरे, कुमशेत, पाचनई आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालन करणारे आदिवासी शेतकरी आहेत. पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेळ्यांचे पावसात ओले होण्याचे प्रमाण कमी होते, शिवाय थंडीसुद्धा जाणवत नाही.