रायगड | हर्षल भदाने : अलीकडे जनावरांना योग्य खुराक मिळत नसल्यानं जनावरांना अनेक शारिरीक व्याधी होतात, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं निर्माण होताहेत. त्यातच उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यातून अन्न पदार्थ शोधून खाणाऱ्या जनावरांच्या पोटात अनेकदा प्लास्टीक जातं. ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्यानं अनेकदा जनावरं प्लास्टीकही खातात. मात्र ते पचन होत नाही आणि नंतर त्यामुळे शारिरीक व्याधी होतात. अशातच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Twenty kg Plastic in Cow Stomach, Raigad)
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या करंजा गावात गायीच्या पोटातून 1-2 किलो नाही तर तब्बल 20 किलो प्लास्टिक आणि नट बोल्ट बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोटाचा घेर वाढल्याने गायीला दिवसेंदिवस त्रास होत होता. उपचार करूनही ती सतत वेदनेनं ओरडत होती. ही वाढती वेदना पाहून उरण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने मेटल डिटेक्टरद्वारे गाईच्या पोटाची तपासणी केली. त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. गायीच्या पोटात प्लास्टीक आणि लोखंडी वस्तू असल्याचं समजलं.
गायीच्या पोटात ही सर्व घाण गोळा झाल्याचं समजल्यानंतर डॉ.सोमनाथ भोजने, डॉ. महेश शिंदे, डॉ. महेश सावंत व डॉ. अनिल धांडे आदीं अनुभवी टीमने ऑपरेशनद्वारे गायीच्या पोटातून सुमारे 20 किलो प्लास्टिक व धातूच्या वस्तू बाहेर काढून गायीचे प्राण वाचवले. पोटातून बाहेर काढलेल्या वस्तूंमध्ये पिशव्याचे तुकडे, नट बोल्ट ब्लेड इत्यादी वस्तू समाविष्ट होते.