अग्निपथ या योजनेच्या माध्यमातून तरुणांना चार वर्ष सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचं म्हणच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. मात्र त्यानंतर आता यावरुन देशातील काही राज्यांत अग्नितांडव सुरु आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शेकडो लोकांनी गाड्या आणि रेल्वे स्थानकांची जाळपोळ आणि तोडफोड केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत 'ज्याप्रमाणे कृषी कायदे मागे घ्यावा लागले, त्याचप्रमाणे अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल,' असं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "सलग 8 वर्षांपासून सरकारने 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, हे सुद्धा मी यापूर्वीही म्हटलं होतं. त्याचप्रमाणे त्यांना आता 'अग्निपथ' मागे घ्यावी लागेल असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
सरकारने सैनिक आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप या ट्विटद्वारे राहुल गांधींनी केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या. 3 वर्षांपासून भरती झाली नाही, तरुणांच्या पायाला फोड आलेत, ते निराश आणि हतबल झाले आहेत. तरुण वायुसेना भरती निकाल आणि नियुक्त्यांची वाट पाहत होते. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, भरती थांबवली." असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. काँग्रेसच्या वतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ताज्या माहितीनुसार, काँग्रेसचं हे आंदोलन मोठ्या स्वरुपात होणार असून, त्यात अनेक बडे नेते आणि खासदार सहभागी होऊ शकतात.