अमोल धर्माधिकारी | पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात (Gudipadwa melava) मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास त्याठिकाणी लाऊडस्पीकर्स नेऊन हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसैनिकांना (MNS) दिले होते. मात्र, या भूमिकेला पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदा वरुन हटवून साईनाथ बाबर यांना मनसेचे नवे शहराध्यक्ष करण्यात आले आहे. परिणामी वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पुण्यात मनसे मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुक आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडल्याचे समजते. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर या व्हॉटसअॅप ग्रूपवर जाहीरपणे मतभेद सुरू झाले होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी वसंत मोरे स्वत:हून या ग्रुपमधून बाहेर पडल्याचे सांगितले जाते.
वसंत मोरे नेमंक काय म्हणाले?
वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.