अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
याच पार्श्वभूमीवर आता अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटात अल्पवयीन मुलगा सामील असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीविरुद्ध 200 पानी तपास अहवाल सादर करण्यात आला आहे.
बाल न्याय मंडळात विशेष सरकारी वकील शिशीर हिरे आणि सहायक वकील सारथी पानसरे यांच्यामार्फत 200 पानी तपास अहवाल सादर करण्यात आला असून त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात कलमवाढ केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पुरावा नष्ट करणे, बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक, कट रचणे अशी कलमवाढ केली आहे.