चंद्रशेखर भांगे, पुणे
जागतिक महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यात आला. मात्र पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. एका 27 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या मासिक पाळीतील रक्त कापसाने जमा करून तिच्या सासरच्या मंडळींनी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहण्यास असून दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेल्यानंतर तिच्या मासीक पाळी दरम्यान सासरच्या मंडळीने तिचे हातपाय बांधून तिचे मासीक पाळीचे रक्त कापसाने काढत ते बाटलीत भरुन ५०हजारात जादुटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला ही पुण्यात विश्रांतवाडी परिसरात असलेल्या आपल्या माहेरी आली होती. सगळा घडलेला प्रकार तिने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका महिन्याने तिची स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलीस कामकाज स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.