मुंबई पुणे एक्स्प्रेस वे खासगी बसला आग लागल्याचं थरार पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.
सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. 42 प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच हा मोठा अनर्थ टळल्याचे म्हटले आहे. ही बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बस मधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्स च्या समयसुचकतेमुळे 42 जणांचे प्राण वाचले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बसने एक्स्प्रेस वे वरच पेट घेतल्यामुळे याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर देखील झाला, काही काळ या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बसने पेट घेतला होता. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत बस पुर्णपणे जळून खाक झाला आहे.