वाढत्या महागाईची झळ आता जास्तच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅससह बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने राज्यातील नागरिक मेटाकुटीस आले असतानाच, आता यात कांदा आणि भाजीपाल्याच्या महागाईची फोडणीही बसणार आहे.
सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेल्याने, पुढील सुमारे दोन महिने वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची चिन्हे आहेत. परिणामी सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचे चित्र आहे. त्यातच भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दरही सुमारे ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. जोडीला तेलाचे दरही भडकल्याने रोजच्या जमाखर्चाचा मेळ कसा बसवायचा, असा प्रश्न गृहिणींपुढे उभा ठाकला आहे.