नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) संयुक्तिक उमेदवार देण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. तर बिनविरोध निवडणूक होण्यासाठी भाजप (BJP) चर्चा करत आहेत. अशातच आजपासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी अकरा जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. आगामी दिवसांत आणखी काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव समोर येत होते. परंतु, शरद पवारांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे विरोधकांकडून दुसऱ्या नावाची चाचपणी सुरु झाली आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजनाथ सिंह विरोधकांशी चर्चा करत आहेत. पण, कॉंग्रेस आणि भाजपने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर 11 उमेदवारांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केले आहे. यात लालू प्रसाद यादव यांचेही नाव समाविष्ट आहे. परंतु, या गृहस्थांचा आरजेडी पक्षांशी कोणताही संबंध नसून केवळ नावात साधर्म्य आहे. तर मुंबईतील मोहम्मद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल या दाम्पत्यांनेही अर्ज दाखल केला आहे. या दाम्पत्याने 2017 मध्येही राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरला होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले अर्ज
1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9. लालू प्रसाद यादव, बिहार (RJD प्रमुख नाहीत)
10. ए. मणिथन, तामिळनाडू
11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे निकष काय?
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35 हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी देशाचे नवीन राष्ट्रपती कोण असणार, हे निश्चित होणार आहे.