भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 28 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 28 जुलैपासून पुढील 3 दिवस ते महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात राष्ट्रपती अनेक जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात 28 जुलै रोजी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या दर्शनाने होणार आहे. त्यानंतर त्या लिज्जत पापड कंपनीच्या महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
29 जुलै रोजी त्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्याचदिवशी मुर्मू सायंकाळी मुंबईतील विधान भवन येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभास उपस्थित राहतील. मुर्मू यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर, पुणे-मुंबई तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेट देणार आहेत. तसेच 30 जुलै रोजी द्रौपदी मुर्मू नांदेड येथे असलेल्या गुरुद्वारा भेट देणार आहेत. गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर त्या लातूर येथील उदगीरला रवाना होणार आणि नंतर बुद्ध विहारच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर त्याच दिवशी त्या दिल्लीला परतणार आहेत.