Pravin Darekar Press Conference: मला वाटतं मनोज जरांगे यांनी थोडं सबुरीनं घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मॅनेज होऊ शकत नाही, हीच तुमची ताकद आहे, हे महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहित आहे. म्हणून आपल्या मागे मराठा समाज पूर्णपणे उभा आहे. तुम्हाला कुणी काय बोललं की शिवराळ भाषा बोलायचं बंद करा. स्वत:ची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला माजोरडा म्हणायचं. आंदोलनातच्या यशामुळे त्यांनी डोक्यात हवा जाऊ देऊ नये. त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांचं नेतृत्व करावं. त्यांनी राजकारण करण्यापेक्षा मराठ्यांच्या प्रश्नांवर फोकस करावा, असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर म्हणाले, मराठा समाजासाठी सरकार काय करतय, हे आम्ही कालच्या अधिवेशनात सांगितलं. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी पहिलं बलिदान दिलं. त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी १ लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं. मराठा समाजाच्या प्रश्नांविषयी सरकार सकारात्मक आहे. सरकारकडून चर्चैच्या फैरी दिल्या जात आहेत. पण आम्ही जे प्रश्न उपस्थित करत आहोत. त्या प्रश्नांची दखल घेण्याऐवजी शिवराळ भाषा वापरायची, एकेरी बोलायचं, पण मला वाटतंय मराठा समाजाला हे आवडत नाही. त्यांना अजूनही सांगत आहोत की, आपला जागा जमिनीवरून वैयक्तिक वाद नाही.
त्यामुळे आपला कलगीतुरा नाही. तुम्ही वैयक्तिक गोष्टींवर आलात, तर समोरचा माणूस २०-२५ वर्षे राजकारणात असतो, तोही वैयक्तीक गोष्टींवर येऊ शकतो. आम्ही २० वर्ष आंदोलन, लाठ्याकाठ्या, मारहाण या संघर्षातून तयार झालो आहेत. गरिब कुटुंबातून येऊन आम्ही प्रगती केली आहे. समोरच्याची कुंडली काढायची आणि वाटेल ते बोलायचं, हे त्यांनी थांबवलं पाहिजे. म्हणजे आपल्यातच कोणत्याही प्रकारची कटुता येणार नाही. याची दक्षता घ्यावी. सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. त्यामुळे संयमाने बोलावं. चांगल्या शालीन भाषेत बोलावं. त्याचा परिणाम चांगला होतो. मागण्या ताकदीनं मांडल्या पाहिजेत.
आम्ही तुमच्या सोबत आहोत. मराठा आंदोलन आजच झालंय का? अण्णासाहेब पाटलांपासून अनेक मराठा नेत्यांनी आणि संघटनांनी आंदोलनं केली आहेत. अनेक नेत्यांनी बलिदानं दिलं आहे. अनेक नेत्यांनी या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजासाठी सर्व लोक काम करत आहेत. पण जरांगेंच्या भूमिकेवर एखादा विषय मांडला तर मराठा समाजाचा कसा काय अपमान होतो? मराठा समाजाने तुमच्या नावावर सातबारा करुन दिला आहे का? सर्व तुमच्या सोबत असतील. पण एकमेकांना दुखवायचं काम करू नका. प्रत्येकाचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान असतं. त्यांनी थोंड संयमानं आणि सबुरीनं घ्यावं, म्हणजे निश्चितच त्यांच्या आंदोलनाला यश मिळेल, असंही प्रविण दरेकर म्हणाले.