आज नागपूरात अजित पवार गटाच्या पहिल्या संकल्प मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होत. या मेळ्याव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राज्याच्या राजकरणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी २०१९मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. अमित शाह यांनी आपल्याला अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरेंना केलेला. त्यानंतरही त्यांनी वारंवार याबद्दल भाष्य केलं.
२०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे गट सत्तेपासून दूर झाला. मात्र महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, असा गौप्यस्फोट आता प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेकडे ५६ आमदारांचं संख्याबळ होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेकडे ५४ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो असता ते काहीच बोलले नाहीत.
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं, यासंदर्भातील चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. परंतु त्यांनी मौन बाळगलं. राष्ट्रवादीला त्यापूर्वीदेखील संधी आलेली मात्र मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, ही खंत आहे. असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही आक्षेप नोंदवला.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे. जेव्हा निकाल येईल तो आमच्या बाजूने लागेल. चिन्ह आम्हाला मिळेल. त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.