दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्ये संदर्भात त्यांच्या कन्या पूनम महाजन यांनी मोठा दावा केला आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजप नेते आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन यांची 2006 मध्ये त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली होती. मात्र, या हत्येबाबत झी समुहातील वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूनम महाजन यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर जवळपास वीस वर्षांनी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने या प्रकरणाबाबत भाष्य केलं असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी मुंबईतील वरळी येथील प्रमोद महाजन यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. "प्रमोद महाजन यांच्या हत्यामागे मोठे षडयंत्र होतं आणि ते कधीतरी बाहेर येईलच, केवळ पैशांसाठी किंवा मत्सरापोटी झालेलं हे कृत्य नसून त्याच्यामागे मोठे षड्यंत्र आहे, असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 18 वर्षांनी या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
"प्रमोद महाजनांवर झाडलेली गोळी ही एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची नव्हती. कारण त्या गोळीचे आणि बंदुकीचे पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केस लढू शकला असता तुमचं आयुष्य घालवू शकला असता. पण त्याच्या मागे ती गोळी एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची नव्हती. त्याच्या मागे फार मोठे षडयंत्र होतं. आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल की ते षडयंत्र काय होतं. त्यातूनच कळेल की हे सगळं का झालं. दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं," असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.