Nanded Latest News: नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावात धक्कादायक घटना घडलीय. पेवा गावातील पोलीस पाटलाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. बालाजी जाधव असं आत्महत्या केलेल्या पोलीस पाटलाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बालाजीने व्हिडीओ शेअर केला. हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हे आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप बालाजी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
पोलीस निरीक्षकांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता. मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवण्यात आली, असा रिपोर्ट त्यांनी तयार केला होता, अशी माहिती आत्महत्या करण्यापूर्वी बालाजी यांनी व्हिडीओत सांगितली. १५ दिवसापूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीयवादातून खून झाल्याचे सांगण्यात येते.
याच घटनेशी संबंधीत असलेल्या आरोपीची पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांच्याकडे विचारपूस केली होती. पण आपल्यावर खोटा आरोप होत असल्यानं बालाजी यांनी जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता.