छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे. हा सोहळा 6 जूनपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो. . महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.