देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10व्यां दा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ला येथे साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदीं म्हणाले की, मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.
मणिपूरमधील लोकांनी मागील काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित केली आहे. त्यांनी हे शांततेचं पर्व पुढे न्यावं. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील, असं मोदींनी म्हटलं आहे.