संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्याने त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यंदाचे बजेट प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचं किरण घेऊन येणार आहे. बजेटकडे फक्त भारताचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. आज देशासाठी गौरवाचा दिवस आहे. आज देशात नारीशक्तीचा सन्मान करण्याची संधी आहे. देशाच्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री या दोन्ही महिला असल्याचा अभिमान आहे. असे मोदी म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.