माझ्यासाठी गॅरंटी तीन अक्षरांचा खेळ नाही. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी. २०४७ पर्यंत २४ तास फक्त तुमच्यासाठी. पुढील पाच वर्षात तीन कोटी गरिबांना घर दिलं जाईल. देशात असलेल्या ७० वर्षांवरील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत दिला जाईल. वयोवृद्धांना सांगा, तुमचा मुलगा दिल्लीत बसला आहे, तुम्हाला उपचार देईल. पाईपने जसं पाणी येतो, तसं पाईपने आता पाईपने गॅस दिला जाईल. देशातील काना कोपऱ्यात वंदे भारत सारखी आधुनिक ट्रेन धावेल. देश बुलेट ट्रेनचं स्वप्न पूर्ण होताना पाहिल. एनडीए सरकारने बँकांच्या माध्यमातून वर्ध्यातील महिलांसाठी १२०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत पाठवली आहे. आम्ही गावागावीत मुलींना ड्रोन पायलट बनवणार, हीच मोदींची गॅरंटी आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेत रणशिंग फुंकलं.
जनतेला संबोधीत करताना नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ पूर्वी देशात निराशा होती. गावात रस्ते, पाणी, वीज येणारच नाही, असं सर्वांना वाटत होतं. गरिबांना वाटत होतं की, गरिबीतून आम्हाला मुक्ती मिळणार नाही. कितीही मेहनत घेतली तरी नशिब बदलत नाही, असं शेतकऱ्यांना वाटत होतं. महिलांना वाटत होतं, त्यांच्या समस्या कधी सुटणार नाही. ज्यांना कुणीही विचारलं नाही, त्यांना गरिबाच्या या मुलानं पुजलं आहे. दहा वर्षात आम्ही २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. आम्ही गावागावात वीज पोहोचवली. देशातील ११ कोटी लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं. १० वर्षात चार कोटी गरिब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला.
दहा वर्षात ५० कोटींपेक्षा जास्त लोक बँकेला जोडले गेले असून अर्थव्यवस्थेचा भाग बनले आहेत. काही गावांमध्ये वीज, रस्ते, पाण्याची समस्या असेल, पण माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहेत. तुम्ही अशा लोकांची माहिती घ्या, आणि मला पाठवा. त्यांना सांगा, मी मोदींची गॅरंटी घेऊन आलो आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील. मला सर्वांचीच सेवा करायची आहे. तुम्ही मोदी बनून माझी मदत करा. आत्मविश्वासाने भरलेला देश मोदीची गॅरंटी पाहत आहे. गॅरंटी देण्यासाठी खूप हिंमत लागते. पूर्णपणे कमिटमेंट असते आणि मनात एक संकल्प असतो, की मी हे काम करणार. कितीही संकट आलं तरी, मी कारणे देणार नाही, ते काम पूर्ण करणार
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचं धोरण विकासविरोधी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात राहिली आहे. म्हणून देशात कित्येक वर्षे शेतकऱ्यांची परिस्थिती खराब झाली. काँग्रेसच्या सरकारमुळे विदर्भाला खूप नुकसान झालं. पण आमच्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी काम केलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार पूर्ण शक्तीनं तुमचा विकास करत आहेत. ही धरती अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या संगमाची जमिन आहे. इथे आष्टी गावाची प्रेरणा आहे. इथे कित्येक संतांचे आशीर्वाद मिळत आहे. आज चैत्र्य एकादशी आहे. रुप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी, दोहा विठ्ठव बरवा, दोहा माधव बरवा, सर्वत्र असा गजर सुरु आहे.
मी गुजरातमध्ये जन्मलो आहे. स्वाभाविकपणे वर्धा आणि अमरावतीत विशेष नातंही आहे. वर्धा महात्मा गांधींची कर्मभुमी आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. स्वातंत्र्यापूर्वी गांधींजींनी हे स्वप्न पाहिलं होतं. म्हणून देश निर्णायक पाऊल उचलणार आहे. पण यासाठी वर्ध्याचं आशीर्वाद पाहिजे. वर्धा आणि अमरावतीच्या लोकांचं समर्थन पाहून असं वाटतं आता भारताचं लक्ष्य दूर नाही. एव्हढा मोठा जनसागर मी यापूर्वी पाहिला नाही. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम वाढला आहे. म्हणून महाराष्ट्र म्हणतोय पुन्हा एकदा मोदी सरकार, असं म्हणत मोदींनी लोकसभा निवडणुकीत विजयी झेंडा फडकवण्याबाबत विश्वास व्यक्त केला.