कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी कानपूर जिल्ह्यातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचं मूळ गाव पारौंखमध्ये गेले होते. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाषण करताना मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. मोदी म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, मला देशात मजबूत विरोधक हवा आहे. देश आणि लोकशाहीला वाहिलेल्या पक्षांमधून त्यांना एक मजबूत विरोधक हवा आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मी कोणाच्याही विरोधात नाही, माझा कोणाशीही वैयक्तिक संबंध नाही, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कानपूर ग्रामीण भागावर केंद्रित कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केलं. समारंभात राष्ट्रपती आणि पारौंख गावावर आधारित माहितीपटही दाखवण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे राष्ट्रपतींचं वडिलोपार्जित निवासस्थान 'मिलन केंद्र' त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आलं आहे. त्याचं सामुदायिक केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. यामध्ये बचत गटातील महिलांना विविध कामांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः या भव्य कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.