नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' दरम्यान देशातील लोकांना 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया प्रोफाइलवर "तिरंगा" हा त्यांचा प्रोफाइल फोटो म्हणून ठेवण्याचे आवाहन केलं. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' मोहिमेचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ही मोहीम पुढे नेऊया, अनेक कार्यक्रम आणि योजनांच्या माध्यमातून ही मोहिम आपण पुढे घेऊन जातोय, या मोहिमेचं जनआंदोलनात रूपांतर होत असल्याचं पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणारा 'अमृत महोत्सव' एका लोकचळवळीचं रूप धारण करत आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोक आणि समाजाच्या प्रत्येक घटकाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. 'मन की बात' च्या 91 व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उल्लेख केला आणि 13 ऑगस्टपासून घरोघरी तिरंगा फडकावून या चळवळीचा भाग होण्याचं आवाहन सर्वांना केलं.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना अभिवादन केलं. ‘अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत देशभरात आयोजित विविध कार्यक्रमांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.या एपिसोडमध्ये मेघालयमध्ये स्वातंत्र्यसैनिक यू. तिरोत सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम, कर्नाटकातील अमृता भारती कन्नड नावाची मोहीम आणि स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी संबंधित रेल्वे स्थानकांवर आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अशा कार्यक्रमांची मोठी यादी आहे. अशा कार्यक्रमांमध्ये देशवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.