आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (diesel) दरांत वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 80 पैशांनी महाग झाले आहे, तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपयांवर पोहोचले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज पेट्रोलचा भाव 120.51 रुपये लिटर आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल 104.77 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे रेट 110.11 रुपये तर डिझेलसाठी 100.19 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये लिटरवर पोहोचले आहे. अनेक दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. मात्र गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ सुरू झाली आहे.
आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.