पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली. ४ ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं.
आज न्यायालयात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आज संजय राऊत यांना जामीन मिळणार का ईडीच्या तुरुंगात त्यांचा मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कथित घोटाळ्यात खासदार संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून १ कोटी ६ लाख रुपये मिळाल्याचा ईडीचा आरोप आहे. अधिक तपासासाठी राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी ईडीने सोमवारी केली होती, मात्र केवळ राजकीय सूडापोटी राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. अशोक मुंदरगी यांनी केला.
तसेच पत्राचाळ प्रकरणाचा तपास २०२० साली आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला असून सत्ता बदलताच राऊत यांच्यावर ईडीने कारवाईचा फास आवळल्याचे त्यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. या युक्तिवादानंतर न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावत राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली होती.