दसऱ्यानिमित्त आज बीडमध्ये दोन मेळावे होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे मेळावा होणार आहे. या दसऱा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. तर दुसरीकडे नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्याकडे लक्ष लागलेले आहे. यातच पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
मनोज जरांगे यांच्या मेळाव्याबाबत प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाषणात काय बोलेल हे आताच सांगता येणार नाही. भाषणातच सर्व परिस्थितीवर बोलणार आहेत. नारायण गडावर आज एक मेळावा होत आहे. आमचा मेळावा तर दरवर्षी होत असतो. पण नारायण गडावर आज मेळावा होतोय हे खरं वैशिष्ट्ये आहे. मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरच्या मेळाव्याला येणार आहेत. ते काय बोलतील याची उत्सुकता आहे, असं सांगतानाच मनोज जरांगे यांचा मेळावा पारंपारिक नाही. त्यामुळे ते काय बोलणार हे ऐकायचं आहे. आमचा मेळावा पारंपारिक आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याशी आमचा काही संबंध नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. यावर त्या म्हणाल्या, आम्ही 12 वर्षानंतर एकत्र येतो हे वैशिष्ट्ये नाही. ही परंपरा आहे. आमच्यासाठी आम्हाला भगवानबाबा महत्त्वाचे आहेत. आम्ही कधी एकत्र मेळावा केला नाही. गोपीनाथ मुंडे असताना आम्ही खाली बसून भाषण ऐकायचो. पण आम्ही मेळाव्या निमित्ताने कधी एकत्र आलो नाही. आता आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र एकाच मंचावर येऊन भाषणं देत आहोत. त्यामुळे मंचावर एकत्र येण्याची आम्हाला सवय लागली आहे, असंही त्या म्हणाल्या.