आज (29 जून) आषाढी एकादशी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. दर्शनासाठी तब्बल 24 ते 26 तास भाविकांना रांगेमध्ये उभे राहवे लागत आहे. त्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
महापूजा पहाटे संपल्यानंतरही दर्शन रांग अतिशयसंथपणे पुढे सरकत असल्याने उपस्थित भाविकांनी मोठा गोंधळ केला. पूजा सुरु असतानाही मुख दर्शनाची रांग पहिल्यांदाच सुरु ठेवल्याने जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना मुखदर्शन घेता आले आहे.
पूजा झाल्यानंतरही रांग पूढे सरकत नसल्यामुळे काही तरुण भाविकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सर्व आठ पत्राशेडमधील भाविक या गोंधळात सहभागी झाले. पोलिसांच्या मदत केंद्राजवळ जाऊन पोलिसांनाच जाब विचारात मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत भाविकांनी आपला संताप व्यक्त केला.