Kolhapur Flood Update: राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं असून सावित्री, उल्हास नदीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. कोल्हापूरमध्येही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील प्रमुख २९ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसच पुरग्रस्त भागातील ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याचं चित्र आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्यानं या धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८,६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढणार आहे.
पंचगंगा नदी ४३ फुटांवर म्हणजेच धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता वाढली आहे. दिवसभरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने एका राष्ट्रीय महामार्गासह ११ राज्य मार्ग, २९ प्रमुख जिल्हा मार्ग , १३ इतर जिल्हा मार्ग आणि २५ ग्रामीण मार्गांवर पुराचे पाणी आल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पूराच्या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.