सुरेश वायभट पैठण | पैठण छत्रपती संभाजीनगरचा प्रवास आरामदायी होणार आहे, आज पासुन या मार्गावर वातानुकूलित (एसी) ई-बस दाखल करण्यात आली आहे. या ई-बसमधून प्रवासासाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर बसमधून प्रवास करण्यासाठी ११५ रुपये भाडे द्यावे लागणार असून या बस सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
आज पहिल्याच दिवशी या बसमध्ये प्रवशांची गर्दी आसल्याने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उभे राहून प्रवास केला आहे. पैठण बस आगारात या चार वातानुकूलित बस आल्याबरोबर विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते बसेसचे पूजन करण्यात आले. प्रत्येक प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व या चार बसेस प्रवाशांनी खचाखच भरून छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाल्या आहेत. या बसेस मध्ये सर्व सवलती उपलब्ध केले असून ज्या साध्या बसेसमध्ये सवलती आहे त्या सर्व सवलती या वातानुकूलित बसेस मध्ये उपलब्ध असणार आहे.
महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये या बसेस मधून प्रवास करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना तिकिटात प्रवास करता येणार आहे व ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना अमृत योजने मधून या बस मधून मोफत प्रवास करता येणार आहे. तर दिव्यांग व्यक्तींना सुद्धा या बसेस मधून सवलती मध्ये प्रवास करता येणार असल्याची माहिती पैठण आगारप्रमुख गजानन मडके यांनी दिली आहे. यावेळी पैठण आगार प्रमुख गजानन मडके , छत्रपती संभाजी नगर येथील सिडको बस आगार प्रमुख संतोष घाणे पैठण बस आगारातील अधिकारी कर्मचारी चालक वाहक आदी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.