नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चौटाला यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासासह 50 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चौटाला यांच्या चार मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहेत. यामध्ये हेलीरोड, पंचकुला, गुरुग्राम आणि असोला येथील मालमत्तांचा समावेश आहे. यापूर्वी दिल्ली न्यायालयाने हरियाणाचे (Haryana) माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरवले होते. विशेष न्यायाधीश विकास धुळ यांनी निकाल देताना पुढील सुनावणी 26 मे निश्चित केली. सीबीआयने 2005 मध्ये या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता.
चौटाला यांना यापूर्वी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती
यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात चौटाला यांना 10 वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षेच्या वेळेचा सदुपयोग करत हरियाणाचे 82 वर्षीय माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी 12वीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास केली होती. शिक्षेदरम्यान ते तिहार तुरुंगातील कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या केंद्रावर नॅशनल ओपन स्कूलने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेला बसले होते. 23 एप्रिल रोजी अंतिम परीक्षा झाली. यावेळी त्यांची पॅरोलवर सुटका झाली, मात्र परीक्षा केंद्र कारागृहाच्या आवारात असल्याने ते पुन्हा कारागृहात आले आणि परीक्षेला बसले होते.