दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.
याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. कोणाच्या पाठीशी आता आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे, याबाबत विचार करावा असे त्यांनी सांगितले आहे.