लखनऊ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा भाजपा खासदार बृज भूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यामुळेच रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, राज ठाकरे यांनी हा सर्व सापळा असल्याचे म्हणत अयोध्या दौरा रद्द केल्याचे सांगितले. मात्र, यानंतरही बृज भूषण सिंह यांनी राज ठाकरेंना मी नक्कीच माझा हिसका दाखवेन, असे म्हणत डिवचले होते. बृज भूषण सिंह विरुध्द मनसे असा वाद चिघळत असतानाच यावर आता उत्तर भारतीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. बृज भूषण सिंह उत्तर प्रदेशचे नाव खराब करण्याचे काम करत आहे, अशी टीकाच उत्तर भारतीयांनी केली आहे.
बृज भूषण सिंह यांच्या विरोधात उत्तर भारतीय आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध केला आहे. उत्तर प्रदेशचे खासदार बृज भूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी व नंतरच अयोध्येला यावे, अशी धमकी दिली होती. यावर बृज भूषण यांचा निषेध करण्यासाठी आणि राज ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी उत्तर भारतीयांनी मुंबईच्या मेट्रो स्टेशनखाली आंदोलन केले.
गेले 14 वर्ष बृज भूषण हे झोपले होते का? त्यांच्याकडे 14 कॉलेज आहेत. त्यामध्ये त्यांनी कोणाला किती नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे आत्ता हे बृज भूषण सिंग आमचं नाव खराब करण्याचं काम करत आहे. बृज भूषण सिंग कधी मुंबईत आले तर त्यांना आम्ही चप्पलांचा हार घालणार, अशी धमकीही या आंदोलनात दिली आहे. जर अयोध्येला राज ठाकरे गेले तर आम्ही देखील त्यांच्या सोबत जाणार असल्याचा निर्धार उत्तर भारतीयांनी केला आहे.
आंदोलक आज बृज भूषण यांच्या फोटोला चपलांचा हार घालणार होते. मात्र, याआधीच पोलिसांनी फोटो काढून घेतला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, बृज भूषण सिंह यांनी आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांनी यापूर्वी उत्तर भारतीयांना त्रास दिला आहे. यामुळे माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पायच ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच, ते मला कधी विमानतळावर भेटले तर मी नक्कीच त्यांना माझा हिसका दाखवेन, असेही म्हंटले होते. याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.