राज्यात सध्या महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपमध्ये (BJP) मोठा संघर्ष सुरु आहे. त्यातच मनसेने (MNS) देखील हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेला (Shivsena) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता अपक्ष असणाऱ्या अमरावतीच्या राणा दाम्पत्याने देखील हनुमान चालिसेचा (Hanuman Chalisa) मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचणार, आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असं म्हणत राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान दिलं आहे. त्यावर आता नितेश राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
"बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला आव्हान देण्याची कोणाची हिमंत झाली नाही. मात्र आता कोणीही ऐरा गैरा येतो आणि टपली मारून जातो. म्हणूनच मी मॅवमॅव आवाज काढला होता. तो का काढला हे आता महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय. एक अपक्ष आमदार आणि एक खासदार मातोश्रीवर जाण्याचं आव्हान देतायत आणि सांगतायेत की, हनुमान चालीसा म्हणणारच...हीच तर शिवसेनेची लायकी राहीली आहे. हीच आताच्या मातोश्रीची ताकद राहीलीय. एकेकाळी बाळासाहेब मातोश्रीत बसून पुर्ण देशाला आव्हान द्यायचे. तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिमंत झाली नाही. आज कोणीही उठतं काहीही बोलतं." असं राणे म्हणाले आहे. एकूणच नितेश राणे यांनी यावरून पुन्हा एकदा घेरत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे,