Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil: भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरुच आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार आमनेसामने आल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच निलेश लंके यांनी सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. मला कधीही फोन करा, दहावेळा फोन करा. कावळ्याच्या आधी सुजय विखे येईल. लोकसभेला माझ्या मित्राने असंच केलं होतं, अशी प्रतिक्रिया देत विखे यांनी निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर लंके यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले खासदार निलेश लंके?
आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली, असं मी अनेकदा म्हणालो. मतदानं झालं आणि निकालही लागला. त्यामुळे मी तरी सर्व गोष्टींवर पडदा टाकला आहे. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला मी प्रत्युत्तर देणं, माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. तसच निलेश लंके यांनी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणावरही मोठं विधान केलं. माध्यमांशी बोलताना लंके म्हणाले, कुठल्याही अधिकाऱ्यांनी असं वर्तन करणं चुकीचं आहे. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे.
महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशन निवडणुकीत मतदानाच्या अधिकारापासून खासदार निलेश लंके यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरविले होते. याबाबत लंके यांनी आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. याविषयी बोलताना लंके म्हणाले, आम्ही वरिष्ठांकडे दाद मागितली आहे. ती कायद्याला धरून आहे. त्यांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीने अपात्र केलं आहे. त्यामुळे ही लढाई देखील आम्ही जिंकणार आहोत. आमचे नाव या यादीत पुन्हा येईल, याची खात्री आहे.