ठाणे : शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी निखिल भामरे (Nikhil Bhamre) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नाशिक वरून ताब्यात घेण्यात आलेल्या निखिल भामरेला गुन्हे शाखेने ठाणे कोर्टात हजर केलं. ठाणे गुन्हे शाखेने त्याला काल ताब्यात घेतलं होतं. निखिल याने शरद पवार यांच्यावर गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या संदर्भात एक ट्विट केलं होतं ज्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आज त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निखिलवर नाशिक आणि ठाणे यासह अनेक शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
निखिल भामरे या तरुणाने अत्यंत वाईट पद्धतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांना मारण्याची अप्रत्यक्ष धमकीच आरोपीकडून देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत, त्याच्यावर कारवाई केली होती. त्याची वैद्यकीय तपासणी करणार असून, ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात येईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिला अद्याप दिलासा मिळाला नाही. केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला काल (18 मे) ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी केतकी चितळे हिला सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे.