काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. या विधानावर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी अजित पवार यांनी २४ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भोसले यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी तुषार भोसले यांना स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांतील अतंर समजत नसेल तर त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आम्ही समजवायला येऊ, असे म्हणाले.
सुरज चव्हाण म्हणाले की, तुषार भोसले यांनी जागा व वेळ सांगावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांमधील अंतर समजवून सांगण्यात येईल. हे अंतर त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगण्यात येईल. अजित पवार यांच्याविरोधात बोलण्याअगोदर आपली पात्रता पहावी,” असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिले आहे.
तुषार भोसले यांनी अजित पवार यांनी २४ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा प्रचंड अभिमान होता. ते धर्माचे पुरस्कर्ते होते. तुमच्या पवार घराणाऱ्याचा फडतूस राजकारणाकासाठी छत्रपती संभाजी महाराजांना निधर्मी किंवा सेक्युलर करू नका. २४ तासांच्या आत माफी मागा अन्यथा उद्यापासून सगळा हिंदू समाज तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरेल,” असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.