अर्चना पाटील यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी हातात आता राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे. धाराशिवमधून अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाकडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घोषित केलं. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अर्चना पाटील धाराशिवच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली आहे. अर्चना पाटील धाराशिवच्या लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत. घड्याळ चिन्हावर त्या निवडणूक लढवणार आहेत, असं सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
तसंच उमेदवारी घोषित केल्यानंतर अर्चना पाटील म्हणाल्या, सर्व नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशीव मतदार संघासाठी निश्चित केलं आहे. याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व अतिशय कणखरपणे करत आहेत. मोदी साहेब ४०० पार करून निवडून येणार आहेत.