पुण्यात शरद पवार गटाकडून महागाईच्या होळीचं दहन करण्यात आलं. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ही होळी पेटवण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कोल्हे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. शिरुर मतदार संघात आढळराव पाटील यांच्या येण्यानं वेगळं चित्र निर्माण झालंय, या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले, "लोकशाहीत कुणीतरी स्पर्धक नक्कीच असणार. आढळराव पाटील याआधी घड्याळाच्या विरोधात लढत होते आता घड्याळावर लढणार आहेत, तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना कोल्हे म्हणाले, हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त चांगलं होईल. २० वर्ष ज्या कार्यकर्त्यांच्या विरोधात संघर्ष केला, आज त्याच कार्यकर्त्यांच्या आधारावर ते निवडणूक लढवत आहेत. पण राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत, असं त्यांच्यावतीने मी ऐकलेलं नाहीय.
होळी पेटवण्याचा उद्देश काय आहे ? अमोल कोल्हे म्हणाले, या पवित्र अग्नित जे जे अभद्र आणि अमंगल आहे, ते नाश होतं. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. त्या पद्धतीनं देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारी, एकाधिकारशाही दिसते, त्या सर्व अभद्र गोष्टी होळीत जळून नाश व्हाव्यात, हीच मागणी केलीय. महादेव जानकरांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. महायुतीसोबत आहे, त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. यावर बोलताना कोल्हे म्हणाले, मला याबाबत अधिकृत माहिती नाहीय. त्यामुळे यावर बोलणं मला योग्य वाटत नाहीय.
गादी विषयी जो मान आहे, तो कायम आहे. वर्षानूवर्षे ही माझी भूमिका कायम आहे. सोशल मीडियावर काही जणांनी यासंदर्भात भावना व्यक्त केल्या. ही जर कार्यकर्त्यांची आणि स्वत: महाराज साहेबांची इच्छा असेल, तर यापद्धतीनं ती उमेदवारी जाहीर व्हावी, अशी त्या लोकांची अपेक्षा आहे. पण हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही.
विजय शिवतारे यांच्या विधानांमध्ये किती वास्तविकता आहे, हे लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतरच समजेल. पवार साहेबांविषयी बोलल्यावर सर्व जण चर्चेत येतात. गेली ५५ वर्षे पवार साहेबांनी जनतेसाठी काय केलं आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे आपल्याला देशपातळीवर दिसत आहे. महाराष्ट्रात अब की बार चारसो पारचा नारा लावत होते. पण शिवसेना फोडून हे होत नाही, हे त्यांना कळलं. नंतर राष्ट्रवादी फोडून चारसो पार होत नाही, हे कळलं, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनला सोबत घेऊनही कदाचित चारसो पार होत नाहीत. त्यांना आता रासपचीही गरज भासते, ही आज वस्तुस्थिती आहे. दिल्लीत भाजपची परिस्थिती बिकट आहे.
आम आदमी पक्षाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम भाजप करत आहे. हरयानात मुख्यमंत्री बदलतात. भाजपाची राजकीय परिस्थिती चांगली दिसत नाहीय. सर्व सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत होती, ती आता अघोषित केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना जागावाटपासाठी दिल्लीला जातं येतं, पण कांदा निर्यातबंदीचा प्रश्न घेऊन जाता येत नाही. हे विदारक सत्य राज्यातली जनता पाहत आहे, असंही कोल्हे म्हणाले.