शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. यावरच कुठलही सरकार पाच वर्षांचं असतं. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र ठरले तर राज्याची विधानसभा बरखास्त होईल. हे सरकार चुकीचं आहे असा निर्णय जर न्यायलयाने दिला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. अशा वेळेस कलम 172 नुसार विधानसभा टिकत नाही. असा दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला होता. यावरच “तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला”अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, उद्या जरी कुणी अपात्र ठरले आणि इतर कुणी सत्तास्थापनेचा दावा केला, तर राज्यपालांना संधी द्यावीच लागेल. ज्यावेळी त्रिशंकू परिस्थिती असते तेव्हा राष्ट्रपती शासनाची परिस्थिती उद्भवते. तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला. असीम सरोदे विधिज्ञ आहेत, वकिलीचा त्यांचा अभ्यास केला आहे, त्यामुळे आक्षेपार्ह विधान करायचे नाही. पण मला वाटत नाही, ते म्हणाले तसं काही होणार नाही. तसेच जर तरच्या विधानांना अजित पवार उत्तर देत नसतो, असे त्यांनी सांगितले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांंनी बंडखोरी करणार असं जाहीर केलं आणि त्यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला. राहुल कलाटेंना नेमकी कोणाची फूस आहे असं विचारल्यास अजित पवार म्हणाले की, त्यांना कोणाची फूस आहे यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही मात्र ज्यावेळी राहुल कलाटे आणि माझी भेट होईल तेव्हा मी त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारीन असं त्यांनी स्पष्ट केलं.
या घटनेच्या मागे मास्टर माईंड कोण आहे?
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक झाली, अशी बातमी कानावर आली होती. प्रत्येकाचे सरंक्षण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब या प्रकरणात लक्ष घातले पाहीजे. या घटनेच्या मागे मास्टर माईंड कोण आहे? हे शोधून काढत त्याला कडक शासन केले पाहीजे. अशाप्रकारचे हल्ले कुणावरच होता कामा नये. लोकशाहीत विरोधकांनाही तेवढेच महत्त्वाचे स्थान असते. विरोधकांना सुरक्षित वाटले पाहीजे, असेही ते यावेळेस म्हणाले.