मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलीच टीका केली आहे. आव्हाड हे नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. आव्हाड म्हणाले की, “हे मुख्यमंत्री नाहीत, तर ‘व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र’ आहेत. व्हाईसरॉय कसा त्याच्या हातात कायदा असल्याप्रमाणे कोणाचंही ऐकायचा नाही, तसेच एकनाथ शिंदे व्हॉईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील तेव्हा नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही. आता एवढंच शिल्लक राहिलं आहे. नाहीतर पोलिसांना सांगतील तुम्ही जाऊन बटन दाबून या.”असे आव्हाड म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना वाटतं संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं. अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही. असं कधी असतं का?” आणि कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. आम्ही सांगू तो कायदा आणि तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रभर राबवला जातो आहे. ठाण्यात तर टिपून टिपून मारतात, तसं टिपून टिपून मारलं जात आहे.”असे म्हणत आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.