"कर्तृत्व हे फक्त पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येही कर्तृत्व असतं. इंदिरा गांधी यांनी जगात देशाचं नावलौकीक वाढवलं. कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळाली तर महिला सुद्धा उत्तम काम करतात आणि जगात त्यांचा सन्मान केला जातो," अशी मोठी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते जेजुरीत क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
जनतेशी संवाद साधताना यावेळी ते म्हणाले, खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीत महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून लोक येतात. अडचणी येतात पण त्यांच्यावर मात करण्याची हिंमत असली पाहिजे. पाणी कमी असतानाही येथील शेतकऱ्यांनी फळबाग फुलवण्याचं काम केलं. पिंपरी चिंचवड हे एक महत्वाचं औद्योगिक क्षेत्र बनलं आहे. कारखानदारी वाढवायची असेल तर ती एका ठिकाणी न करता विविध ठिकाणी केली पाहिजे. कारखानदारीमुळे हजारो लोकांना काम मिळतं. कारखानदारी वाढली आहे,पण त्यांचं वैशिष्ट्य काय, याची तपासणी आधी केली पाहिजे.
महाराष्ट्रात पाण्याची अडचण आहे. निव्वळ सिंचनावर अवलंबून राहणं ही बाब महाराष्ट्राच्या हिताची नाही. औद्योगिक गुंतवणीक वाढली पाहिजे. औद्योगिक क्षेत्रात महिलांचंही कर्तृत्व मोठं आहे. महिलादिनानिमित्त सर्व महिलांचे आभार मानतो. औद्योगिक सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. १५६ देशात सायरस पुनावाला यांचं वॅक्सिन वापरलं जातं. पुनावाला यांनी या ठिकाणी लोकांना वॅक्सिन दिलं, त्यांचेही मी आभार मानतो, असंही पवार म्हणाले.